काही महिन्यांपूर्वी 'काळोखाचा रंग कोणता' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं, आवडलंही. पण मग जरा विस्मृतीत गेलं. गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं. किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहे. नेमकं सांगायचं तर डिप्रेशन, आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर.
लखलखणार्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती
एकही तारा इथे दिसेनाका आकाशी वरती
वाट हरवता वाटसरूला दिशा कशी समजावी ?
ध्रुव बाळाच्या अढळपदाची गोष्ट कुणा उमजावी ?
सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले
काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले
शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता ?
एकही तारा इथे दिसेनाका आकाशी वरती
वाट हरवता वाटसरूला दिशा कशी समजावी ?
ध्रुव बाळाच्या अढळपदाची गोष्ट कुणा उमजावी ?
सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले
काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले
शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता ?
या अवस्थेमध्ये कशातच मन रमत नाही. ना कामात, ना आपल्या छंदात..ज्या गोष्टी आपल्याला कायम आनंद देत आल्या त्याही अगदी नीरस वाटायला लागतात. घरातल्या इतरांचे, आसपासच्या लोकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालत असतात मात्र यांच्यासाठी काळ थांबल्यासारखा झालेला असतो. काय करायचं, कशासाठी करायचं.. आयुष्याची सगळी गणितं फोल वाटायला लागतात..समुद्राच्या ऐन मध्यावर बोट येऊन थांबावी आणि एकुलतं एक होकायंत्र बंद पडावं अशी अवस्था ..कुठून आलो ? कुठे चाललो ? की इथंच असे अडकलेले होतो आयुष्यभर ?..सगळे प्रश्न..फक्त प्रश्न.. न संपणारे..स्वतःला कोणतंच उत्तर द्यायचा आत्मविश्वास नाही. एरवी, जवळची, जीवाभावाची असणारी माणसं जणू दुसर्याच एखाद्या जगात असावीत इतकी दूर भासायला लागतात..आतड्याच्या देठापासून हाक मारलेली असते पण संवाद होतच नाही..स्वतःच्याही नकळत त्यांनी भोवती एक कोष विणून घेतलेला असतो..ज्यातून यांची धडपड बाहेर कुणापर्यंत पोचतच नाही...आपला आपल्यालाही आवाज येऊ नये असं सगळं विरून जातं कुठच्या कुठे....या सर्वापासून पळून जावं लांब झोपेचा आश्रय घेऊन, तर तीही गनिमी कावा खेळते. आकाशात देखणा चंद्र, हलका वारा, शांत रात्र..काय लागतं अजून निद्रेच्या बाहूत स्वतःला झोकून द्यायला..पण तीच रात्र यांना खायला उठते..भरून राहते एक नि:शब्दता.. शांतता नाहीच ती..कारण अपार अस्वस्थता भरलेली असते त्यात..केवळ नि:शब्दता..
चहूकडे कोलाहल केवळ गडबड गोंधळ सारा
कुणीही कुणाशी बोले ना कल्लोळ तरी घुमणारा
शांत रात्र, सळसळता वारा, चंद्र नभी दडलेला
रात्रीला निद्रानाशाचा रोग इथे जडलेला
सारी नगरी सजलेली, गजबजलेली, बजबजलेली
यंत्रा मागून यंत्र धावती हृदये सारी निजलेली,
साद कुणाची वाद कसा संवाद कोणता ?
कुणीही कुणाशी बोले ना कल्लोळ तरी घुमणारा
शांत रात्र, सळसळता वारा, चंद्र नभी दडलेला
रात्रीला निद्रानाशाचा रोग इथे जडलेला
सारी नगरी सजलेली, गजबजलेली, बजबजलेली
यंत्रा मागून यंत्र धावती हृदये सारी निजलेली,
साद कुणाची वाद कसा संवाद कोणता ?
माझ्या व्यावसायिक अनुभवावरून मला हे खूप पक्कं माहीत आहे की डिप्रेशनमध्ये गेलेले लोक जवळच्या, विश्वासातल्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, ..पण कधी कधी ते तितकं गंभीरपणे घेतलं जात नाही, वेळेच्या अभावामुळे म्हणा किंवा मदत करण्याच्या इच्छेच्या अभावामुळे म्हणा. आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा या व्यक्ती असे प्रयत्नही करायचं सोडून देतात. खूप अगतिक, खोल दलदलीत रुतत जावं अशी असते ही अवस्था. भोवती गोंधळ, कोलाहल आहे, सजीवपणाच्या सर्व प्रतिमा दर्शनी आहेत पण तरीही आपल्या मनातली व्यथा, भीती, दडपण कुणाला कळत नाहीये, जणू सगळं निर्जीव आहे, यंत्रवत आहे. आणि कुणाशी संवाद होतच नाहीये.. ही शांतता अजूनच लोटत जाते खोल खोल..अंधार्या गुहेत रस्ता हरवून आणखी आतआत हरवत जावं तसं. जुन्या हिंदी चित्रपटात तो महालातला जिना असायचा ना ज्यातून ती नायिका (जी आता जिवंत नसते) ती हातात एक कंदील घेउन खाली जाते, तो जिना असतो डिप्रेशनची वाट. गोलगोल आणी खालीखाली जाणारा..न संपणारा..बाहेर पडण्याची वाटच नाही त्यातून...
हे गाणं इतकं भावण्याचं कारण म्हणजे ते ऐकताना एक प्रकारची आश्वासकता जाणवत राहते. त्या आवाजाच्या पलीकडे एक व्यक्ती आहे, जिला नेमकं कळलेलं आहे आपण आता कशा मनःस्थितीत आहोत ते, असा एक क्षणिक का होईना पण आशादायक विचार येतो. या जगात कुठेतरी, कुणीतरी आहे असं की ज्यांना आपली अस्वस्थता, घालमेल समजतेय हे वॅलीडेशन झाल्याचं फीलिंग येतं. आणि एखाद्यासाठी तीच नवी सुरुवात असू शकते, नाही का ?
- सायली
('काळोखाचा रंग कोणता' हे मूळ गीत हे 'उबुंटु' या चित्रपटातील असून, ते गीतकार समीर सामंत यांनी लिहीले आहे आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले आहे.)