Posts

पत्र

  प्रिय ... चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ?   ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे.. नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग.        आपण आता उणीपुरी सहा-सात वर्षे एकत्र आहोत. की जास्त ? मी नेहमी म्हणते तसे, आपली ओळख जन्मांतरीची आहे, भेटलो आपण अगदी अलीकडे. स्वतंत्र विचार करणारे, दोघेही आपापल्या करियरमध्ये स्थिर, आपापले छंद जोपासत एकटे पण आपापल्या परीने परिपूर्ण आयुष्य जगणारे. रूढी आणि समाजनियमांप्रमाणे लग्नाचे वय आणि कमिटमेंट्ची मानसिकता हे जाऊनही खूप काळ झाला होता. आपण आपले आहे तसे एकटे छान आहोत, आणि तसेच सुखात असणार आहोत हे दोघांचे...

नातं

Image
तसे पहायला गेले तर हे दोघे अखंड सोबत दोघेही मनस्वी, स्वछंदी आहेत  पण जमलेले आहेत त्यांचे सूर  एक तो, अथांग ओलावा घेऊन जगणारा कधी उधाणून, आनंदाच्या गर्जना करत फेसाळणारा  तर कधी निशब्द हलक्या तरंगानी माया दाखवणारा आणि एक धगधगता, धुमसता कधी तापवून अक्षरशः गुदमरवून टाकणारा  तर कधी थापटण्याहून हलकी वाटावी अशी ऊब देणारा  त्यांचं ते समजून घेतात एकमेकांना, उमजून चालतात अहोरात्र मध्ये रात्रीपुरता विरह, जो नित्यनियमाने येणारा ही ताटातूट केवळ तात्पुरती, काही काळापुरती आणि निश्चितपणे संपणारी आहे हे दोघे जाणून असतात त्या काळात ते आपापली वाट आक्रमत राहतात, पण साथ सोडत नाहीत कधी कधी मात्र निरोपाच्या वेळी असा नेमका संदेहाचा ढग येतो मध्ये निरोपाशिवायच दिवस संपतो सकाळची प्रतीक्षा रात्रीला नको तेवढी लांबवते त्या सगळयात एकमेकांच्या साथीची ओढ मात्र अजूनच घट्ट झालेली असते, त्या ढगाच्याही नकळत  खऱ्या अंतरीच्या नात्यांचंही असंच होतं   ना ? 

भेट

  आज अचानक अगदी ध्यानीमनी नसताना आमची भेट झाली. अगदी त्याच्या आणि माझ्या भेटीसारखी.   आदल्या रात्रीच्या भरतीत भिजून आताही पायाला गारसर लागत असलेल्या मातीतून चालताना , पुढे आणखी गार पाण्यात जायचे नाही असे ठरवले . पण त्याच्या बेफाम लाटांजवळ माझ्याही नकळत मी ओढली गेले . त्यानेही तितक्याच उत्स्फूर्तपणे पुढ्यात येऊन मला क्षणात भिजवून टाकलं . लक्षात येईपर्यंत मी चिंब होऊन त्याच्यात पुरती विरघळले . सर्व बाजूंनी घट्ट मिठीत घेतल्याचा तो ऊबदारपणा इतका हवासा वाटला की आता किनार्‍यावरची गार हवा मला बोचेनाशी झाली . तो फक्त माझ्याकरिताच झेपावला आहे आणि मी केवळ याच सहवासाकरिता इथवर आले आहे असा काहीसा गोड आभास .. आणि निमिषात तो तितक्याच वेगाने मागे सरला . जे पुरतं अनुभवलंही   नव्हतं ते ओरबाडून काढून घेतल्याची हताश जाणीव .. इतकी भयंकर की त्याच जागी मी सुन्न पाय रोवून उभी राहिले . पुन्हा पुढल्याच लाटेने तो परत येईल याची वाट पाहत . पुढची एकेक लाट येत राहिली आणि त्याला आणखी मागेमाग...