Monday, March 9, 2026

पत्र

 प्रिय ...


चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ? 

ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे..

नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग. 


आपण आता उणीपुरी सहा-सात वर्षे एकत्र आहोत. की जास्त ? मी नेहमी म्हणते तसे, आपली ओळख जन्मांतरीची आहे, भेटलो आपण अगदी अलीकडे. स्वतंत्र विचार करणारे, दोघेही आपापल्या करियरमध्ये स्थिर, आपापले छंद जोपासत एकटे पण आपापल्या परीने परिपूर्ण आयुष्य जगणारे. रूढी आणि समाजनियमांप्रमाणे लग्नाचे वय आणि कमिटमेंट्ची मानसिकता हे जाऊनही खूप काळ झाला होता. आपण आपले आहे तसे एकटे छान आहोत, आणि तसेच सुखात असणार आहोत हे दोघांचेही पक्के ठरले होते आणि अचानक विधीलिखित की काय म्हणतात तसे अनपेक्षितपणे कनेक्ट झालो. 


तुझ्या रुपात सावळ्या कृष्णाचा भास आहे, तुला पाहून आपसूकच 'सावळाच रंग तुझा' हे ओठी आले होते. तुला आठवते? पुढे ओळख वाढल्यावर हे सांगितले होते मी तुला, तेव्हा तु मला "आता गाऊनही दाखव" असा आग्रहही केला होतास. पण रुपापेक्षा मला ओढ जडली ती तुझ्या स्वभावाची. इतका यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलेला पण कमालीचा साधा. माझ्यासारखाच साध्या, छोट्या गोष्टीत आनंद मानणारा. पैसा, यश, नाव या कशाकशाचा बडेजाव न करणारा, स्वतःतच रमणारा, स्वतः बोलण्यापेक्षा जास्त समोरच्याचे ऐकणारा. या ओळखीचा पुढे तुझ्या सोबत असण्याची सवय लागण्यापर्यंतचा प्रवास बराच काळ चालू होता. एक मात्र मला खूप सुरुवातीला जाणवले होते, की ही सोबत आयुष्यभराची आहे. 


जसे जवळ आलो तसे एकमेकांच्या स्वभावातले बारकावे, खटकणार्‍या गोष्टीही जवळ आल्या. सर्व कपल्समध्ये येतात तशी आव्हाने, वादविवाद, रुसवेफुगवे हेही सगळे होऊन गेले आणि चालू आहे. पण एक गोष्ट सुटली नाही, साथ न सोड्ण्याची अबोल शपथ. याचे खूपसे श्रेय खरे तर तुलाच आहे. मी खूप पटकन चिडते आणि खूप चिडते, ते तु कायम शांतपणे सांभाळून घेतोस. हा एकच नाही, इतरही अनेक दोष आहेतच माझ्यात पण ते मला जाणवू न देता त्याचा स्वीकार केलास तु आणि मग मीही स्वतःला शब्द दिला, ही सोबत मरेपर्यंत जपेन. 


एका काळानंतर दोघांना जेव्हा जाणवू लागले की एकत्र राहणे हेही दोघांसाठी आनंददायी होणार आहे, तेव्हाच आपण पुढे जाण्याचे ठरवले. तुला हा विश्वास वाटला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. वाद झालेत, होतीलही पण कोणताही वाद तुला माझ्यापेक्षा मोठा नसेल अशी मलाही खात्री आहे. 

पण ही खूप मोठी झेप आहे रे. या वयात एकाच घरात इतका वेळ एकत्र घालवून एकमेकांसाठी अनोयिन्ग न होणे यासाठी आपल्याला कमीत कमी प्रयत्न करावे लागतील अशी मला आशा आहे. त्यात माझे काम म्हणजे ठरलेल्या वेळा. क्लिनिकच्या वेळी अजिबात फ्लेक्झिबलिटी नाही. पण एकदा घरी आले की आले की पूर्ण वेळ आपला. याउलट तुझे काम दिवसरात्र चालू, कधी अनेक दिवस बाहेरगावी. अगदी घरात जरी असलास तरी विचाराने पूर्ण दुसर्‍या, कामाच्या जगात. पण एक सांगू, तु माझ्या जवळ असशील आणि ते पुरेसे असेल. लांब असलो ना की फोनवरचा, वेळ मिळेल तेव्हा केलेला मेसेज आणि समोर असताना बोलता जरी आले नाही तरी सहज कळणारी बॉडी लॅन्ग्वेज यात खूप फरक आहे. 


मी तुला नेहमी सांगते ना, की मला सर्वात जास्त तुझ्याजवळ असावे असे केव्हा वाटते ते तुझी तब्येत बरी नसताना. आता मला तुझी छान काळजी घेता येईल, माझ्या हक्काच्या पेशंटची. तुझी अ‍ॅसिडीटी ची पथ्ये, जेवणाच्या वेळा, प्रवासानंतर पाठ-मानेची रिकव्हरी हे सगळे मला सांभाळता येईल. मी जरी डॉक्टर असले तरी आजारी मीही पडणारच आहे, मलाही तुझ्या सोबतीची गरज लागणार आहे तेव्हा. आपण बोललोय तसे सन्ध्याकाळचा एक वॉक आपण एक रिचुअलसारखा रोज एकत्र करण्याचा प्रयत्न करुया, अगदी उद्यापासूनच. कधी जमले तर शतपावली आणि आइसक्रीम. तुझ्याबरोबर आणि तुझ्याच वाटीतले इम प्रोम्टु नॅचरल्सचे टेंडर कोकोनट आइसक्रीम खाणे हे माझ्यासाठी किती स्पेशल आहे ते तुला सांगायची गरज नाही. केवळ शारीरिक सुख आपल्या दोघांसाठी कधी खूप महत्वाचे नव्हतेच. आणि त्या व्यतिरिक्तही अनंत गोष्टी एकत्र करण्यात किती आनंद आहे हेही आपण अनुभवलेले आहेच. वयानुसार, आणि एकत्र राहण्याची नवलाई संपली की ते आणखीनच गौण होणार आहे पण त्याबरोबरच एकत्र करण्याच्या खूप गोष्टी आपण आता करु शकणार आहोत. तुझ्या आवडत्या फिल्म्स पाहुया, तुझे त्यावरचे विचार, एखाद्या तज्ञासारखी परीक्षणं ऐकायला नेहमीच आवडतात मला. मिळून स्वयंपाक करुया, बाजूला गुलजार ऐकता ऐकता. तुला आठवते आपण पहिल्यांदा एकत्र राहिलो तेव्हा पोहे करताना तु आलास आणि कांदा कापून दिलास, मी जवळपास उडले होते, तुला ते येतं हे पाहून. पण आता मला तुझ्या आवडीचे बनवून खायला घालायचे आहे, जे आतापर्यत फारसे जमले नाहीये.  तुला वाटेल काय, ही टीपीकल बायकोसारखी बोलायला लागली पण वाटतेय असे तर त्याला काय करू ? 


थोडक्यात काय तर तू भेटण्याच्या पूर्वीच्या आयुष्यात जे जे एकटीने एन्जॉय केले, आणि जे राहून गेले, ते सर्व तुझ्या सोबतीत असणार आहे. आता तु नेहमीसारखे म्हणत असशील, "केवढी बोलतेस तू ??" त्यामुळे थांबते. पण जाताजाता (की येतायेता) तुला आज वचन देते, उद्यापासून माझ्यातली मी जेवढी मी स्वत:ला मिळते, माझ्या काम जबाबदार्‍यांमधून, ती संपूर्णपणे तुझी आहे, तुझ्यासाठी आहे आणि तरीही तुला हवी तेवढीच असण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. एकत्र राहत असलो तरी मी तुझ्या पूर्ण आयुष्याचा एक भाग आहे, त्याचे सेंटर नाही ही जाणीव मी कायम ठेवीन. एकत्र राहू तसे आपण एकमेकांना आणखी जास्त कळू लागणार आहोत. आपल्या सुखाच्या कल्पना, सोबतीच्या अपेक्षा बदलतही जातील कदाचित त्या आपण वेळोवेळी अशाच पत्रामध्ये अपडेट करूया. हाच मार्ग असेल सहवासातला आनंद टिकवण्याचा आणि वाढवण्याचा. Cheers to us! 


तुझीच..


No comments: