पत्र
प्रिय ...
चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ?
ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे..
नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग.
आपण आता उणीपुरी सहा-सात वर्षे एकत्र आहोत. की जास्त ? मी नेहमी म्हणते तसे, आपली ओळख जन्मांतरीची आहे, भेटलो आपण अगदी अलीकडे. स्वतंत्र विचार करणारे, दोघेही आपापल्या करियरमध्ये स्थिर, आपापले छंद जोपासत एकटे पण आपापल्या परीने परिपूर्ण आयुष्य जगणारे. रूढी आणि समाजनियमांप्रमाणे लग्नाचे वय आणि कमिटमेंट्ची मानसिकता हे जाऊनही खूप काळ झाला होता. आपण आपले आहे तसे एकटे छान आहोत, आणि तसेच सुखात असणार आहोत हे दोघांचेही पक्के ठरले होते आणि अचानक विधीलिखित की काय म्हणतात तसे अनपेक्षितपणे कनेक्ट झालो.
तुझ्या रुपात सावळ्या कृष्णाचा भास आहे. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा आपसूकच 'सावळाच रंग तुझा' हे ओठी आले होते. तुला आठवते, पुढे ओळख वाढल्यावर हे सांगितले होते मी तुला, तेव्हा तु मला "आता गाऊनही दाखव" असा आग्रहही केला होतास. पण खरं सांगू, रुपापेक्षा मला ओढ जडली ती तुझ्या स्वभावाची. इतका यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलेला पण कमालीचा साधा. माझ्यासारखाच साध्या, छोट्या गोष्टीत आनंद मानणारा. पैसा, यश, नाव या कशाकशाचा बडेजाव न करणारा, स्वतःतच रमणारा, स्वतः बोलण्यापेक्षा जास्त समोरच्याचे ऐकणारा. या ओळखीचा पुढे तुझ्या सोबत असण्याची सवय लागण्यापर्यंतचा प्रवास बराच काळ चालू होता. एक मात्र मला खूप सुरुवातीला जाणवले होते, की ही सोबत आयुष्यभराची आहे.
जसे जवळ आलो तसे एकमेकांच्या स्वभावातले बारकावे, खटकणार्या गोष्टीही जवळ आल्या. सर्व कपल्समध्ये येतात तशी आव्हाने, वादविवाद, रुसवेफुगवे हेही सगळे होऊन गेले आणि चालू आहेत. पण एक गोष्ट सुटली नाही, एकमेकांची साथ कधीही न सोडण्याची अबोल शपथ. याचे खूपसे श्रेय खरे तर तुलाच आहे. मी खूप पटकन चिडते आणि खूप चिडते, ते तु कायम शांतपणे सांभाळून घेतोस. हा एकच नाही, इतरही अनेक दोष आहेतच माझ्यात पण ते मला जाणवू न देता त्याचा स्वीकार केलास तु आणि मग मीही स्वतःला शब्द दिला, ही सोबत मरेपर्यंत जपेन. एका काळानंतर दोघांना जेव्हा जाणवू लागले की एकत्र राहणे हेही दोघांसाठी आनंददायी होऊ शकते, तेव्हाच आपण पुढे जाण्याचे ठरवले. तुला हा विश्वास वाटला, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. वाद झालेत, होतीलही पण कोणताही वाद तुला माझ्यापेक्षा मोठा नसेल अशी मलाही खात्री आहे.
पण ही खूप मोठी झेप आहे. या वयात एकाच घरात इतका वेळ एकत्र घालवून एकमेकांसाठी annoying न होणे यासाठी आपल्याला कमीत कमी प्रयत्न करावे लागतील, अशी मला आशा आहे. त्यात माझे काम म्हणजे ठरलेल्या वेळा. क्लिनिकच्या वेळी अजिबात flexibility नाही. पण एकदा घरी आले की आले की पूर्ण वेळ आपला. याउलट तुझे काम दिवसरात्र चालू, कधी अनेक दिवस बाहेरगावी. अगदी घरात जरी असलास तरी विचाराने पूर्ण दुसर्या, कामाच्या जगात. एकमेकांपासून लांब असताना ह्या सर्वांतून आपल्याला नक्की काय वाटते आहे, काय सांगायचे आहे, हे समोरच्यापर्यंत पोचवणे खरंच खूप कठीण असते. वेळ मिळेल तेव्हा केलेला त्रोटक मेसेज, घाईघाईत केलेल्या कॉलवर, 'अगदी महत्वाचे आहे ते बोलू, बाकी नंतर' असे म्हणत तसेच निघून गेलेले अनेक दिवस. प्रत्यक्ष समोर असताना माणूस समजायला खूपच सोपा असतो रे.
मी तुला नेहमी सांगते ना, की मला सर्वात जास्त तुझ्याजवळ असावे असे केव्हा वाटते तर ते तुझी तब्येत बरी नसताना. आता मला तुझी छान काळजी घेता येईल, माझ्या हक्काच्या पेशंटची. तुझी अॅसिडीटीची पथ्ये, जेवणाच्या वेळा, प्रवासानंतर पाठ-मानेची रिकव्हरी हे सगळे मला सांभाळता येईल. असंख्य अनोळखी माणसांच्या तब्येतीची जबाबदारी घेणारी मी, सगळ्यात जवळच्या माणसासाठी किती वाहून घेईन याची तुला कल्पना आत्तापर्यंत आली असेलच. पथ्य, व्यायाम ह्या गोष्टी त्रासदायक असण्याची गरज नसते. बरोबरीने केले की त्यातलीही गंमत तुला कळणार आहे. आपण बोललोय तसे संध्याकाळचा एक वॉक आपण एक ritual सारखा रोज एकत्र करण्याचा प्रयत्न करुया, अगदी उद्यापासूनच. कधी जमले तर शतपावली आणि आइसक्रीम. तुझ्याबरोबर आणि तुझ्याच वाटीतले नॅचरल्सचे टेंडर कोकोनट आइसक्रीम खाणे हे माझ्यासाठी किती स्पेशल आहे, ते तुला सांगायची गरज नाही.
केवळ शारीरिक सुख आपल्या दोघांसाठी कधी खूप महत्वाचे नव्हतेच. आणि त्या व्यतिरिक्तही अनंत गोष्टी एकत्र करण्यात किती आनंद आहे हेही आपण अनुभवलेले आहेच. वयानुसार, आणि एकत्र राहण्याची नवलाई संपली की ते आणखीनच गौण होणार आहे पण त्याबरोबरच एकत्र करण्याच्या खूप गोष्टी आपण आता करु शकणार आहोत. तुझ्या आवडत्या फिल्म्स पाहुया, तुझे त्यावरचे विचार, एखाद्या तज्ञासारखी परीक्षणं ऐकायला नेहमीच आवडतात मला. मिळून स्वयंपाक करुया, बाजूला गुलजार ऐकता ऐकता. माझी लिस्ट वाढत चालली आहे, असे म्हणत आहेस ना मनातल्या मनात ?
हो रे, थोडक्यात काय तर येणारा प्रत्येक दिवस तुझ्या साथीत अनुभवण्यासाठी मी आतुर आहे.
आता तु नेहमीसारखे म्हणत असशील, "केवढी बोलतेस तू ??" त्यामुळे थांबते. पण जाताजाता (की येतायेता) तुला आज वचन देते, उद्यापासून माझ्यातली मी जेवढी मी स्वत:ला मिळते, माझ्या काम-जबाबदार्यांमधून, ती संपूर्णपणे तुझी आहे, तुझ्यासाठी आहे आणि तरीही तुला हवी तेवढीच असण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. एकत्र राहत असलो तरी मी तुझ्या पूर्ण आयुष्याचा एक भाग आहे, त्याचे सेंटर नाही ही जाणीव तुझ्याप्रमाणेच मीही कायम ठेवीन. एकत्र राहू तसे आपण एकमेकांना आणखी जास्त कळू लागणार आहोत. आपल्या सुखाच्या कल्पना, सोबतीच्या अपेक्षा बदलतही जातील कदाचित, त्या आपण वेळोवेळी पत्रामध्ये अपडेट करूया. हाच मार्ग असेल सहवासातला आनंद टिकवण्याचा आणि वाढवण्याचा. Cheers to us!
तुझीच..
Comments
सर्वात आधी मला जे खूप जाणवलं आणि भावलं ते म्हणजे तू निवडलेला विषय. तो तुझ्या थेट आयुष्याशी संबंधित नसतानाही तू त्यात स्वतःचा अनुभव आणि भावविश्व इतक्या सहज मिसळलं आहेस. विशेषतः तुझ्या मेडिकल बॅकग्राउंडचे छोटे संदर्भ ज्या पद्धतीने त्या नात्याच्या कथेत येतात, त्यामुळे लेखाला एक वेगळी authenticity मिळते.
तुझ्या विचारांचा flow खूप नैसर्गिक आहे. अगदी एखाद्याशी प्रत्यक्ष जसं ओघवतं बोलावं अगदी तसंच लिहिलं आहेस. पत्राच्या स्वरूपात लिहिल्यामुळे वाचताना हा flow खूप natural वाटतो. दोन जवळ येणाऱ्या जीवांचा संवाद... किती प्रामाणिक भावना आहे ही !
“कोणताही वाद तुला माझ्यापेक्षा मोठा नसेल अशी मलाही खात्री आहे.”
हे वाक्य खूप मनापासून आवडलं . एका नात्याचा गाभा इतक्या साध्या शब्दांत सांगितला आहेस तू. अडचणी येतच राहतील पण आपण त्यावर मात करू ही खात्री खूप आश्वासक आहे. कोणतंही नातं adjustment शिवाय फुलूच शकणार नाही आणि ही सगळ्यात मोठी तयारी तू दर्शवली आहेस.
सध्या गूगल आपल्याला जुने फोटो दाखवतं आणि अनेकदा आपल्याला जाणवतं की आयुष्यात लहान आनंदाचं खूप महत्वाचं स्थान आहे आणि बरेचदा तो आनंद त्या क्षणी आपल्या लक्षात येत नाही. पण या लहान आनंदाचं महत्व वॉक, स्वयंपाक, आईस्क्रीम अशा क्षणांमधून दाखवून तू नात्यातली उब दर्शवली आहेस. तुझ्यात छोट्या छोट्या दैनंदिन क्षणांना अर्थ देण्याची छान क्षमता आहे.
मला वाटतं तू अशा प्रकारचे लेख अजून लिहायला हवेस. विशेषतः मानवी नात्यांमधल्या सूक्ष्म भावना तू छान capture करतेस.
Blend of old & new generations.
Confuse असलेल्या (आणि conventional नसलेल्या) आजच्या पिढीला, अशा (त्यांना co–relate करता येईल) अशा अधिकाधिक विचारांच्या लेखनाची गरज आहे.
Blend of old & new generations.
Confuse असलेल्या (आणि conventional नसलेल्या) आजच्या पिढीला, अशा (त्यांना co–relate करता येईल) अशा अधिकाधिक विचारांच्या लेखनाची गरज आहे.