भेट
आज अचानक अगदी ध्यानीमनी नसताना आमची भेट झाली. अगदी त्याच्या आणि माझ्या भेटीसारखी. आदल्या रात्रीच्या भरतीत भिजून आताही पायाला गारसर लागत असलेल्या मातीतून चालताना , पुढे आणखी गार पाण्यात जायचे नाही असे ठरवले . पण त्याच्या बेफाम लाटांजवळ माझ्याही नकळत मी ओढली गेले . त्यानेही तितक्याच उत्स्फूर्तपणे पुढ्यात येऊन मला क्षणात भिजवून टाकलं . लक्षात येईपर्यंत मी चिंब होऊन त्याच्यात पुरती विरघळले . सर्व बाजूंनी घट्ट मिठीत घेतल्याचा तो ऊबदारपणा इतका हवासा वाटला की आता किनार्यावरची गार हवा मला बोचेनाशी झाली . तो फक्त माझ्याकरिताच झेपावला आहे आणि मी केवळ याच सहवासाकरिता इथवर आले आहे असा काहीसा गोड आभास .. आणि निमिषात तो तितक्याच वेगाने मागे सरला . जे पुरतं अनुभवलंही नव्हतं ते ओरबाडून काढून घेतल्याची हताश जाणीव .. इतकी भयंकर की त्याच जागी मी सुन्न पाय रोवून उभी राहिले . पुन्हा पुढल्याच लाटेने तो परत येईल याची वाट पाहत . पुढची एकेक लाट येत राहिली आणि त्याला आणखी मागेमाग...