या नि:शब्दाचा नाद कोणता ?
काही महिन्यांपूर्वी ' काळोखाचा रंग कोणता ' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं . सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं , आवडलंही . पण मग जरा विस्मृतीत गेलं . गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं . किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहे . नेमकं सांगायचं तर डिप्रेशन , आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर . लखलखणार्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती एकही तारा इथे दिसेनाका आकाशी वरती वाट हरवता वाटसरूला दिशा कशी समजावी ? ध्रुव बाळाच्या अढळपदाची गोष्ट कुणा उमजावी ? सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता ? या अवस्थेमध्ये कशातच मन रमत नाही . ना कामात , ना आपल्या छंदात .. ज्या गोष्टी आपल्याला कायम आनंद देत आल्या त्याही अगदी नीरस वाटायला लागतात . घरातल्या इतरांचे , आसपासच्या लोक...