Wednesday, October 3, 2018

या नि:शब्दाचा नाद कोणता ?

    काही महिन्यांपूर्वी 'काळोखाचा रंग कोणता' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं, आवडलंही. पण मग जरा विस्मृतीत गेलं. गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं. किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहेनेमकं सांगायचं तर डिप्रेशन, आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर.  

लखलखणार्‍या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती
एकही तारा इथे दिसेनाका आकाशी वरती
वाट हरवता वाटसरूला दिशा कशी समजावी ?
ध्रुव बाळाच्या अढळपदाची गोष्ट कुणा उमजावी ?
सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले
काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले
शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता ?

या अवस्थेमध्ये कशातच मन रमत नाहीना कामात, ना आपल्या छंदात..ज्या गोष्टी  आपल्याला कायम आनंद देत आल्या त्याही अगदी नीरस वाटायला लागतात. घरातल्या इतरांचे, आसपासच्या  लोकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालत असतात मात्र यांच्यासाठी काळ थांबल्यासारखा झालेला असतो. काय करायचं, कशासाठी करायचं..  आयुष्याची सगळी गणितं फोल वाटायला लागतात..समुद्राच्या ऐन मध्यावर बोट येऊन थांबावी आणि एकुलतं एक होकायंत्र बंद पडावं अशी अवस्था ..कुठून आलो ? कुठे चाललो ? की इथंच असे अडकलेले होतो आयुष्यभर ?..सगळे प्रश्न..फक्त प्रश्न.. संपणारे..स्वतःला कोणतंच उत्तर द्यायचा आत्मविश्वास नाही. एरवी, जवळची, जीवाभावाची असणारी माणसं जणू दुसर्‍याच एखाद्या जगात असावीत इतकी दूर भासायला लागतात..आतड्याच्या देठापासून हाक मारलेली असते पण संवाद होतच नाही..स्वतःच्याही नकळत त्यांनी भोवती एक कोष विणून घेतलेला असतो..ज्यातून यांची धडपड बाहेर कुणापर्यंत पोचतच नाही...आपला आपल्यालाही आवाज येऊ नये असं सगळं विरून जातं कुठच्या कुठे....या सर्वापासून पळून जावं लांब झोपेचा आश्रय घेऊन, तर तीही गनिमी कावा खेळते. आकाशात देखणा चंद्र, हलका वारा, शांत रात्र..काय लागतं अजून निद्रेच्या बाहूत स्वतःला झोकून द्यायला..पण तीच रात्र यांना खायला उठते..भरून राहते एक नि:शब्दता.. शांतता नाहीच ती..कारण अपार अस्वस्थता भरलेली असते त्यात..केवळ नि:शब्दता..

चहूकडे कोलाहल केवळ गडबड गोंधळ सारा
कुणीही कुणाशी बोले ना कल्लोळ तरी घुमणारा
शांत रात्र, सळसळता वारा, चंद्र नभी दडलेला
रात्रीला निद्रानाशाचा रोग इथे जडलेला
सारी नगरी सजलेली, गजबजलेली, बजबजलेली
यंत्रा मागून यंत्र धावती हृदये सारी निजलेली,
साद कुणाची वाद कसा संवाद कोणता ?

    माझ्या व्यावसायिक अनुभवावरून मला हे खूप पक्कं माहीत आहे की डिप्रेशनमध्ये गेलेले लोक जवळच्याविश्वासातल्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, ..पण कधी कधी ते तितकं गंभीरपणे घेतलं जात नाही, वेळेच्या अभावामुळे म्हणा किंवा मदत करण्याच्या इच्छेच्या अभावामुळे म्हणा. आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा या व्यक्ती असे प्रयत्नही करायचं सोडून देतात. खूप अगतिक, खोल दलदलीत रुतत जावं अशी असते ही अवस्था.  भोवती गोंधळ, कोलाहल आहे, सजीवपणाच्या सर्व प्रतिमा दर्शनी आहेत पण तरीही आपल्या मनातली व्यथा, भीती, दडपण कुणाला कळत नाहीये, जणू सगळं निर्जीव आहे, यंत्रवत आहे. आणि कुणाशी संवाद होतच नाहीये.. ही शांतता अजूनच लोटत जाते खोल खोल..अंधार्‍या गुहेत रस्ता हरवून आणखी आतआत हरवत जावं तसं. जुन्या हिंदी चित्रपटात तो महालातला जिना असायचा ना ज्यातून ती नायिका (जी आता जिवंत नसते) ती हातात एक कंदील घेउन खाली जाते, तो जिना असतो डिप्रेशनची वाट. गोलगोल आणी खालीखाली जाणारा.. संपणारा..बाहेर पडण्याची वाटच नाही त्यातून...

    हे गाणं इतकं भावण्याचं कारण म्हणजे ते ऐकताना एक प्रकारची आश्वासकता जाणवत राहते.  त्या आवाजाच्या पलीकडे एक व्यक्ती आहे, जिला नेमकं कळलेलं आहे आपण आता कशा मनःस्थितीत आहोत तेअसा एक क्षणिक का होईना पण आशादायक विचार येतोया जगात कुठेतरीकुणीतरी आहे असं की ज्यांना आपली अस्वस्थता, घालमेल समजतेय हे वॅलीडेशन झाल्याचं फीलिंग येतंआणि एखाद्यासाठी तीच नवी सुरुवात असू शकते, नाही का ? 
- सायली
('काळोखाचा रंग कोणता' हे मूळ गीत हे 'उबुंटु' या चित्रपटातील असून, ते गीतकार समीर सामंत यांनी लिहीले आहे आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले आहे.) 

20 comments:

Mohini Garge Kulkarni said...

अप्रतिम लिहिलं आहेस....अजून लिहीत रहा...खूप शुभेच्छा!

Unknown said...

Khup Chan vivechan kele ahes

Unknown said...

मनाला भावनारे, अचुक शब्दात मांडलेले सुंदर विचारांच लिखाण,

Prajakta Thakur said...

वाह खूपच छान लिहिले आहे... खूपच भावले तुझे लिखाण..❤❤

Kirti said...

सायली, अप्रतिम व्यक्त झाली आहेस... Very promising.. ������

Yogesh Kulkarni said...

सर्वप्रथम अप्रतिम लिखाणाबद्दल अभिनंदन ! असंच खूप लिहीत रहा.
डिप्रेशन मध्ये गेलेली व्यक्ती आणि त्याच्या भावनांना गिताशी जोडण्याचा प्रयत्न हा नक्कीच अनोखा आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली ओळ म्हणजे जिथे तू शांतता आणि निःशब्दता यातला फरक सांगितला आहे. शेवटी सगळंच बोलणं हे उच्चाराने नसतं तर लिखाणाने ही बोलता येतंच.
पुढील लेखाकरिता शुभेच्छा !!

Amit said...

खूप छान लिहिलं आहेस. सगळं जग नुकतंच कठीण प्रसंगातून सावरत असताना याचं मोल विशेषत्वाने जाणवतं!
सुप्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार ने त्याच्या ' परवरदिगार ' गाण्यामुळे एका व्यक्तीने जीवन न संपवण्याचा निर्णय कसा घेतला हे सांगितलं होतं. त्याची आठवण झाली.

Milind N Chitambar said...

Waah! 100% agreed about the depression and pessimism comments! Sanwaad saadhane is THE and the ONLY solution!! Aikanaari loka asane suddha bhagya asate!

Anonymous said...

खूप सुंदर लिहिलंय सायली -स्वतःच्याही नकळत त्यांनी भोवती एक कोष विणून घेतलेला असतो..ज्यातून यांची धडपड बाहेर कुणापर्यंत पोचतच नाही...अगदी योग्य शब्दात वर्णन केलं आहेस! असंच लिहीत रहा, तुला पुढच्या लेखासाठी खूप शुभेच्छा!

Anonymous said...

खूप छान शब्दात व्यक्त झाली आहेस, तुझी लेखन शैली खरंच खूप छान आहे. हे गाणं 'उबुन्टू' ह्या आमच्या चित्रपटात जिथे येतं, तिथे अशीच अवस्था आहे. मी गीतकार समीर सामंतला सांगितलं की ही गावातली लहान मुलं शहरात येऊन अडकली आहेत, त्यामुळे त्यांना पडलेले हे प्रश्न आहेत की गावांत जसं आपल्याला आभाळ दिसतं तसं इथे शहरात का दिसत नाही? इथे कोणाला कोणाशी बोलायला वेळच नाही, असं का आहे? आणि समीरने अप्रतिम लिहलं आहे. कौशल तर कमाल आहेच पण मुग्धा हसबनीस ला याच गाण्यासाठी राज्य पुरस्कार देखील मिळाला.

Anonymous said...

वाह वाह सुपर👌👌👌

Anonymous said...

खूप छान लिहिलंस👌👌

Anonymous said...

Khup sundar likhan! Aajkalchya jagat atyant mahatwachya muddyawar thet haat ghatala ahes. Aasheche kiran dakhavanara shevat mala far bhavala. Ata he gana nakki aikayala hawa ani chitrpatahi pahayla hawa. 😊
~ Shakun

Anonymous said...

किती सुंदर शब्दात मनाची अवस्था मांडली आहेस तू..हे गाणे तर अप्रतिम आहेच शब्द ही सुंदर पण त्यातील एक एक शब्दाचे शब्द भांडार तू मांडलेला अप्रतिम आहे,खूपदा वेळ गेल्यावर वाटत ही व्यक्ती काहीतरी सांगत होती,आपण ऐकायला हवे होते का??तेव्हा कदाचित आपण संवाद साधला असता तर??कदाचित त्या व्यक्तींने मन मोकळे केले असता तर आपण त्याला वेळ दिला असता तर...या जर तर मध्ये अडकण्या पेक्षा ..मोकळे व्हा,संवाद साधा जर कुणाला बोलायचं असेल तर ऐकून घ्या ...खूप सुंदर विषय मांडणी केली आहेस खूप सुंदर शब्द आणि जे तुला म्हणायच ते सुंदर मांडले आहेस लिहीत राहा

समीर सामंत said...

क्या बात है.... 😊🙏🙏🙏

nitanitin said...

एखाद्या काव्याचा इतका सखोल अभ्यास करून सहज लिहिलं आहेस 👍👌👌

अभिजित पेंढारकर said...

एरवी, जवळची, जीवाभावाची असणारी माणसं जणू दुसर्‍याच एखाद्या जगात असावीत इतकी दूर भासायला लागतात..आतड्याच्या देठापासून हाक मारलेली असते पण संवाद होतच नाही..

वा, मस्त लिहिलंय. खरंच येते अशी अवस्था. काही काळ मग सैरभैर व्हायला होतं. आपल्या मनातली प्रेरणा, नवा उत्साह, सकारात्मकता, ह्या सगळ्या गोष्टींचा अशावेळी खूप आधार वाटतो. मग स्वतःशीच सुरू असलेल्या या संघर्षातून वाट काढता येते.
लिहीत राहा. येऊ द्या आणखी!

Anonymous said...

खूपच सुंदर लिहिले आहे.आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि समाज माध्यमांवर अमाप friends आणि followers आहेत पण प्रत्यक्षात अगदी जवळच्यांशी बोलायला देखील वेळ नाही. अशा virtual friends
च्या घराड्यात राहून देखील प्रत्येक जण एकटा फील करतो ..काहीतरी missing आहे असे वाटत राहते आणि मग तुम्ही सांगितलेली अवस्था .परंतु त्याच वेळी समाजात अशी लोक आहेत जी आपल्या संवेदनशीलतेने व्यथा मांडत असतात व त्याचमुळे आशेचा किरण इतरांच्या आयुष्यात दिसतो. तुम्ही देखील त्या पैकी एक आहात हे ब्लॉग चा निमित्ताने कळले. व्यक्त होत राहा.. लिहित रहा .. खूप शुभेच्छा

चिन्मय

अमोल said...

वा वा.. छान लिहिलंय..अवस्था, अस्वस्थता आणि तिचा प्रवास, तिन्ही स्थित्यंतर अचूक आणि नेमकेपणाने पकडली आहेत... मोजकं पण प्रभावी लेखन आहे... शुभेच्छा 🌿

Anonymous said...

सुंदर...
जवळची, जीवाभावाची असणारी माणसं जणू दुसर्‍याच एखाद्या जगात असावीत इतकी दूर भासायला लागतात.