बोनसाय (भाग 1)
शिफ्ट व्हायचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी मानसीची आणखीनच धांदल उडत होती . परक्या देशात आधी कुठे रुळणं अवघड , त्यात असं अचानक उठून एकदम २५०० मैल लांबच्या नवीन शहरात जायचं म्हणजे खरं तर तिला नकोच वाटत होतं . पण विनयला नोकरी बदलणं भाग होतं . हा निर्णय घेतला उणापुरा महिना होता हातात सगळी तयारी करायला . आता सगळी कामं खरं म्हणजे संपत आली होती , विमानाने जाताना बरोबर न्यायचं बारीक सारीक सामान भरायचं उरलं होतं . सकाळीच मूव्हिंग कंपनीचे लोक येऊन सगळं सामान पॅक करून एका मोठ्या ट्रक मध्ये लोड करुन गेले होते . आता उद्या सकाळी एअरपोर्टला जाताना गाड्या त्यांच्या ताब्यात दिल्या की फिलाडेल्फियाला शेवटचा गुड्बाय म्हणायला मोकळे . अंगणातल्या झाडांना एकदा पाणी घालून घेते असं म्हणून मानसी घराबाहेर पडली . तिनं मायेनं वाढवलेल्या या गोतावळ्याशी हितगुज करायला एक शेवटची संध्याकाळ उरली होती . नेहमीच्या सवयीप्रमाणे ती आधी मेपलट्र...