शिफ्ट व्हायचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी मानसीची आणखीनच धांदल उडत होती. परक्या देशात आधी कुठे रुळणं अवघड, त्यात असं अचानक उठून एकदम २५०० मैल लांबच्या नवीन शहरात जायचं म्हणजे खरं तर तिला नकोच वाटत होतं. पण विनयला नोकरी बदलणं भाग होतं. हा निर्णय घेतला उणापुरा महिना होता हातात सगळी तयारी करायला. आता सगळी कामं खरं म्हणजे संपत आली होती, विमानाने जाताना बरोबर न्यायचं बारीक सारीक सामान भरायचं उरलं होतं. सकाळीच मूव्हिंग कंपनीचे लोक येऊन सगळं सामान पॅक करून एका मोठ्या ट्रक मध्ये लोड करुन गेले होते. आता उद्या सकाळी एअरपोर्टला जाताना गाड्या त्यांच्या ताब्यात दिल्या की फिलाडेल्फियाला शेवटचा गुड्बाय म्हणायला मोकळे.
अंगणातल्या झाडांना एकदा पाणी घालून घेते असं म्हणून मानसी घराबाहेर पडली. तिनं मायेनं वाढवलेल्या या गोतावळ्याशी हितगुज करायला एक शेवटची संध्याकाळ उरली होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे ती आधी मेपलट्री कडे वळली. जेमतेम फुट्भर उंचीचं रोप ५ वर्षापुर्वी तिने लावलं होतं ते आता तिच्या उंचीच झालं होतं. रुतुबदलाचा निरोप हाच मेपल घेऊन यायचा तिच्यासाठी. त्याच्या पानाचे रंग बदलू लागायचे तसं त्याला किती जपू आणि किती नको असं व्हायचं तिला. थंडीचा कडाका सुरु झाला की तो सगळी पानं गळून उघडाबोडका व्हायचा. 'माणसांसारखं यालाही गरम कपड्यांचा लेअर चढवता आला असता तर किती बरं झालं असतं ना रे' हे विनय दरवर्षी ऐकत आला होता. आत्ता तोच मेपल हिरव्यागार पानांनी नटला होता. असं सजलेलं लेकरू सोडून जायचं? मानसीच्या गळ्यात माया दाटून आली होती. त्याच्या मुळांजवळ नवीनच लावलेल्या डेकोरेटिव दगडांना उगाचच सारखं केल्यासारखं करत तिने आपली नजर गुलाबाच्या ताटव्याकडे वळवली.
लाल, पिवळे, केशरी, गुलाबी, पांढरा अबोली असे नाना रंग तिथे गर्दी करून उभे होते. एकेक रोप आणल्याची आठवण मानसीच्या मनात लख्ख ताजी होती. कडाक्याचा हिवाळा यायचा तेव्हा सगळी झाडं आता जगणार की मान टाकणार अशा अवस्थेत असताना मोठ्या हिमतीने तग धरणारे हे गुलाब तिचे फार लाडके होते. बोचर्या थंडीत जेव्हा बाहेरही पडता येणार नाही अशा अनेक संध्याकाळी तिने डायनिंग च्या खिडकीतून याच गुलाबांकडे पाहत काढल्या होत्या. कुंडीतल्या मोगरा, अबोली, कडिपत्ता या सगळ्यांना तिने सकाळीच निरोप दिला होता. जवळचे मित्रमैत्रिणी हक्काने एक एक कुंडी घेऊन गेले होते. प्रेमाने सांभाळू असं सांगूनच गेले होते, मानसीचा प्रत्येक पानाफुलावर किती जीव आहे या सगळ्यांना हे इतक्या वर्षाच्या ओळखीनंतर चांगलंच ठाऊक होतं. होता होता निघायचा दिवस उजाडला. भरल्या डोळ्यांनी घरादारावर, पानापानावर हात फिरवून दोघे निघाले. आता ऑस्टीनच्या नवीन घराचं अंगणही आपल्याला असे सोबती देईल का असं विचार करत मानसी विमानात बसली.
- सायली
7 comments:
चांगलंच झालंय. आहे तसा छोटासा प्रसंग, पण छान रंगवला आहे. मानसीच्या अंतरंगात डोकावता आलं. पुढे काय होणार ही उत्सुकता आहे.
सुंदर आणि ओघवत !! जुन्या घरातून नवीन घरात move होताना गुलाब आणि नवीन लावलेल्या मॅग्नोलिया च्या झाडाकडे बघून असाच विचार मनात आला होता - पुढच्या भागाची वाट बघतेय
- मेधा
खूप छान लिहिलं आहेस. माणसाच्या लहानसहान वाटणाऱ्या गोष्टीत, हालचालीत किती महत्वाचा अर्थ दडलेला असतो हे तू लिहिलेले बारकावे वाचताना प्रकर्षाने जाणवलं. पुढच्या भागाची वाट बघतो.
छान लिहिलयस ग. खरच झाडं, त्यांचे ऋतुनुरुप, वर्षांनुरुप वाढणं, बदलणं अगदी मुलाबाळांसारखंच वाटतं. फार जोडले जातो आपण मनानी...
पुढील लेखनाला शुभेच्छा
मस्त लिहिलं आहे. थोडं अजून खुलवायला जागा आहे. आपण जेव्हा एक घर सोडतो तेव्हा आपलं मन प्रत्येक झाडा फुलात तर अडकतच पण घराचा प्रत्येक कोपरा, खोली काही न काही आठवण घेऊन येत असते . साजरे केलेले प्रसंग, काही वेळा मुलांच्या लहानपणीच्या आठवणी.
लिखाण शैली उत्तम आहे 👍
मस्त लिहिलंय. अनुभवता आली चलबिचल.
आवडलं
Post a Comment