भेट

 



आज अचानक अगदी ध्यानीमनी नसताना आमची भेट झाली. अगदी त्याच्या आणि माझ्या भेटीसारखी. 

आदल्या रात्रीच्या भरतीत भिजून आताही पायाला गारसर लागत असलेल्या मातीतून चालताना, पुढे आणखी गार पाण्यात जायचे नाही असे ठरवले. पण त्याच्या बेफाम लाटांजवळ माझ्याही नकळत मी ओढली गेले. त्यानेही तितक्याच उत्स्फूर्तपणे पुढ्यात येऊन मला क्षणात भिजवून टाकलं. लक्षात येईपर्यंत मी चिंब होऊन त्याच्यात पुरती विरघळले. सर्व बाजूंनी घट्ट मिठीत घेतल्याचा तो ऊबदारपणा इतका हवासा वाटला की आता किनार्‍यावरची गार हवा मला बोचेनाशी झाली. तो फक्त माझ्याकरिताच झेपावला आहे आणि मी केवळ याच सहवासाकरिता इथवर आले आहे असा काहीसा गोड आभास..आणि निमिषात तो तितक्याच वेगाने मागे सरला. जे पुरतं अनुभवलंही  नव्हतं ते ओरबाडून काढून घेतल्याची हताश जाणीव.. इतकी भयंकर की त्याच जागी मी सुन्न पाय रोवून उभी राहिले. पुन्हा पुढल्याच लाटेने तो परत येईल याची वाट पाहत. पुढची एकेक लाट येत राहिली आणि त्याला आणखी मागेमागे, माझ्यापासून दूर नेत राहिली. कसे साहू आता हे? भेटलोच नाही म्हणावे तर माझे तळवे मात्र ओलेच होते अजून. भेटीच्या खुणा म्हणून ओल्या पावलांना चिकटलेल्या वाळूसारख्या आठवणी, म्हटलं तर मऊशार, म्हटलं तर काळजाला जखमा करणार्‍या. पाठ फिरवून तशीच मागे फिरले काही वेळाने.. वेड्या आशेवर की तो कधीही मागून पुन्हा गळ घालेल, नको जाऊस. सोबत रहा. लांबवर पोचले, मागे फिरून पाहिले तर तो मात्र क्षितिजाच्या दिशेने वेगात चाललेला, डोहासारखा स्वत:तच खोलखोल बुडणारा. माझ्याकडे आलेल्या लाटेची पुसटशी खूणही नव्हती आता तिथे..माझे तळवे मात्र ओलेच आहेत...अजूनही..


- सायली

Comments

समुद्राचे रूपक (metaphor) वापरून छान मांडणी केली आहे. अगदी छोट्याशा प्रासंगिक गोष्टीतून यथार्थ वर्णन करत उत्तम Personification साधले आहे.
Shubhada said…
खुपच छान सायली. कधी आपण काही जणांना ओझरते भेटतो आणि त्यांच्या त्या थोड्याश्या सहवासानेपण एक अगदी जवळच नातं जुळल्यासारखं वाटत न वाटत तोच ते दूर होतात. One is left with yearning and longing while they are clueless about their impact. खूप सुंदर रित्या हे मांडल आहेस.
SUCH said…
क्षणाची सोबत पण खोलवर रुजलेली.हे खोलवर रुजणे शब्दबद्ध करताना त्यातून स्पष्ट होणारे समाधान आणि हुरहूर ह्या दोन्हीही भावनांचा आविष्कार अप्रतिम !

“म्हटल तर मऊशार म्हटल तर काळजाला जखमा करणाऱ्या “ शहारा आणणारे वाक्य,

निशब्द.
महेश said…
Very touching!! Love it ... Hats off to you, Sayli

Popular posts from this blog

नातं

पत्र

तू