Tuesday, July 18, 2023

तू


निर्झराचा तोल तू 

डोहाहून खोल तू 

धुंद लाटेच्या लयीचा 

उसळता निश्वास तू


गर्द रानी मोह तू  

धुक्यासम अवरोह तू 

सोनचाफ्याच्या कळीचा 

धुंद मंद सुवास तू 


इन्द्रधनुचे जाल तू 

वसंताचा ख्याल तू 

पश्चिमेचे रंगगहिरे 

उसळते आभाळ तू 


पारव्याची साद तू 

घनाचा पडसाद तू 

गंधवेड्या उष्ण देही 

विजेचा उन्माद तू 


अंबराची आस तू 

चांदण्याचा श्वास तू 

मेघवेडी मी अशी अन् 

पावसाचा भास तू 


तेज तू शीतलही तू 

शुभ्र तू शामलही तू 

गुन्तल्या वेलीच माझ्या 

मुक्त अन् स्वच्छंद तू 


प्राणसखया जीव तुजवर 

मुक्त हाती अर्पिला 

वीण ज्याची सोडवेना  

सुखद तो सहवास तू


कोण कुठली राहिले 

तुझीच, तुजला वाहिले

अंतरात नित्य आता 

तूच मी अन् मीच तू 


- सायली